लेखकाबद्दल (About the Author)

✍️ लेखकाबद्दल (About the Author)

मी श्री. सुनिल शेलार, मराठवाड्यातील धाराशिव जिल्ह्यातील परंडा तालुक्याचा रहिवाशी. मध्यमवर्गीय कुटुंबात वाढ झाल्यामुळे समाजातील वास्तव, सहजीवनातील मूल्ये आणि परिश्रमाचे महत्त्व लहानपणापासूनच मनावर कोरले गेले.

मी M.A. (Social Science) शिक्षण घेतले असून, सामाजिक विषयांवरील सखोल अभ्यास करण्याची आवड ही माझ्या आयुष्याची दिशा ठरली. शिक्षण पूर्ण झाल्यानंतर महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या अभ्यासाच्या काळात, भारताचा आणि महाराष्ट्राचा इतिहास, समाज सुधारकांचे कार्य, नागरिकशास्त्र, समाजशास्त्र आणि कायदेव्यवस्था या विषयांचा सखोल अभ्यास केला. या अध्ययनातून माझ्या मानसिक आणि वैचारिक धारेला सामाजिक सुधारणा आणि जबाबदार नागरिकतेची जोड मिळाली.

प्रशासकीय कारकिर्दीच्या प्रवासात, कृषि व सहकार क्षेत्रात “प्रशासन व संपादन अधिकारी” म्हणून जवळपास १५ वर्षां सेवेचा अनुभव घेतला आहे.

सन २०१९ मध्ये पुण्यात स्थायिक होऊन एक भूखंड विकत घेतला आणि त्या परिसरात गृहनिर्माण संस्था स्थापनेचा पुढाकार घेतला. सहकार, नियोजन आणि प्रामाणिक प्रयत्नांमुळे ही संस्था यशस्वीपणे स्थापन झाली आणि सन २०२० ते २०२५ या कालावधीत मला संस्थेचा अध्यक्ष म्हणून काम करण्याची संधी मिळाली.

या पाच वर्षांच्या काळात गृहनिर्माण संस्थांतील विविध समस्या, सभासदांचे प्रश्न, गैरसमज आणि प्रशासनातील अडचणी यांचा सखोल अनुभव मिळाला. त्या अनुभवातूनच समाजात कायदेशीर जागरूकता, पारदर्शकता आणि संवाद संस्कृती वाढविण्याची प्रेरणा मिळाली.

या प्रेरणेतूनच “Sahakar Samvad” या उपक्रमाचा जन्म झाला — एक असे व्यासपीठ, ज्यामार्फत गृहनिर्माण संस्थास्तरावरील अनेक प्रश्न आणि अडचणींचे निराकरण करण्यास निश्चितच मदत होईल.

या माध्यमातून प्रकाशित होणारे सर्व लेख हे कायदेशीर तरतुदी, सहकारी अधिनियमातील कलमे आणि न्यायालयीन निर्णयांवर आधारित राहतील, ज्यामुळे प्रत्येक वाचकाला अधिकृत आणि वस्तुनिष्ठ मार्गदर्शन मिळेल.

🌿 या ब्लॉगचा उद्देश वाद निर्माण करणे नव्हे,
तर जागृती, विचार आणि सहकार या त्रिसूत्रीवर समाजाला बांधणं आहे.