भुखंडधारक संस्थांतील सदस्यांचे मालकी हक्क : “भाडेकरू” या गैरसमजाचे कायदेशीर विश्लेषण

 

“सहकार संवाद” Series - लेख क्र. १

भुखंडधारक संस्थांतील सदस्यांचे मालकी हक्क : “भाडेकरू” या गैरसमजाचे कायदेशीर विश्लेषण

(सहकारी अधिनियम, न्यायालयीन दृष्टिकोन व तर्काधिष्ठित विश्लेषणाच्या आधारे सविस्तर विवेचन)

✍️ लेखक : श्री.सुनिल शेलार, सहकार व कृषि विषयक अभ्यासक.

१. पार्श्वभूमी

भारतीय शहरी भागात जलद नागरीकरण, वाढती लोकसंख्या आणि मर्यादित उपलब्ध जागा या तिन्ही घटकांच्या संगमातून सहकारी गृहनिर्माण संस्थांची संकल्पना उदयास आली. शहरांमध्ये प्रत्येक व्यक्तीस स्वतंत्रपणे घर उभारणे किंवा भूखंड विकत घेणे आर्थिकदृष्ट्या अवघड असल्याने, समान हिताचे नागरिक एकत्र येऊन सहकारी तत्त्वावर गृहनिर्माण संस्था स्थापन करतात. या संस्थांचे उद्दिष्ट केवळ निवासी सुविधा पुरविणे नव्हे, तर मालकी, देखभाल आणि सामूहिक जबाबदारीचे समतोल व्यवस्थापन निर्माण करणे हे आहे.

सहकारी संस्था या संकल्पनेमुळे नागरी जीवनातील अनेक प्रश्न — जसे की मालमत्तेचे कायदेशीर रक्षण, सामायिक सुविधा, दुरुस्ती, खर्चाचे वाटप, शिस्तबद्ध प्रशासन — यांचे उत्तर सापडले. म्हणूनच, शहरी भागातील गृहनिर्माण संस्थांचा उगम हा सामाजिक आणि आर्थिक गरजेचा परिणाम आहे, फक्त कायदेशीर संरचनेचा नाही.

अशा या संस्थांमध्ये, काही वेळा सदस्य आणि संस्थेतील नातेसंबंधाबाबत चुकीचे आकलन निर्माण होते. काही ठिकाणी, काहीजण असा दावा करतात की — “संस्थेची मालमत्ता संस्थेच्या नावावर असून, मिळकत पत्रिकेत सदस्याचे नाव पट्टेदार (L) म्हणून नमूद असल्याने सदस्य हे भाडेकरू ठरतात.”

ही धारणा केवळ तथ्यहीन नाही, तर सहकारी अधिनियम, त्याअंतर्गत नियम आणि न्यायालयीन दृष्टांत यांच्या  कसोटीवर पूर्णपणे चुकीची ठरते. या लेखात आपण हा संभ्रम किंवा गैरसमज सहकार व महसुल अधिनियम, आणि न्यायालयीन दृष्टिकोनातून नेमका कसा चुकीचा आहे हे सविस्तर समजून घेऊ.

हा लेख केवळ सभासदांच्या कायदेशीर जागरूकतेसाठी व संस्थेच्या हितार्थ तयार केला आहे. लेखातील मांडणी कोणत्याही वैयक्तिक सभासद किंवा अधिकाऱ्याविरुद्ध नसून, गृहनिर्माण संस्थांमध्ये वारंवार निर्माण होणाऱ्या “भाडेकरू की मालक” या संभ्रमाचा निरास करण्यासाठी आहे.

२. संबंधित कायदेशीर तरतूदी :-

(अ) महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम, 1960

·     कलम 22 — सभासदत्वाची अट स्पष्ट करताना नमूद करते की, संस्थेच्या उद्दिष्टपूर्तीसाठी योगदान देणारी व्यक्ती सभासद होऊ शकते. भुखंडधारक संस्थेच्या बाबतीत, हे योगदान मालकी हक्कावर आधारित असते, भाडेकरारावर नव्हे.

·   कलम 23 — सभासदत्वामुळे सदस्याला संस्थेच्या कार्यात आणि मालमत्तेत सहभागाचा अधिकार मिळतो.

·   कलम 30(2) — संस्थेच्या मालमत्तेवरील अधिकार हे सदस्यांच्या एकत्रित मालकीवर आधारित आहेत.

·   कलम 73(1) — व्यवस्थापन व निर्णय घेण्याचा अधिकार सभासदांच्या निवडलेल्या समितीकडे राहतो. यावरून संस्था ही सदस्यांची प्रतिनिधी असून, “मालक” म्हणून वरचढ नाही.

(आ) महाराष्ट्र सहकारी संस्था नियम, 1961

या नियमांतील नियम 60 ते 68 मध्ये गृहनिर्माण संस्थेच्या कार्यपद्धती, सभासदत्व व मालकी हक्काचे स्वरूप नमूद केले आहे. या नियमांनुसार, संस्थेचा उद्देश सदस्यांना निवासी सुविधा उपलब्ध करून देणे असून, त्यातून संस्थेला भाडेकरार स्वरूपाचे नाते प्रस्थापित करण्याचा अधिकार दिलेला नाही.

३. सदस्य मालकी हक्क आणि मिळकत पत्रिकेतील “पट्टेदार (L)” नोंद

भुखंडधारक संस्थांच्या बाबतीत जमिनीचा हक्क संस्थेच्या नावावर ठेवला जातो व सदस्याचे नाव “पट्टेदार (L)” म्हणून नोंदवले जाते. ही नोंद भाडेकरूपणा दर्शवत नाही; ती फक्त प्रशासनिक व मालकी व्यवस्थापनासाठी असते. पट्टेदार (L) म्हणजे भाडेकरू नव्हे, तर संस्थेच्या अधीन राहून भूखंडाचा कायदेशीर वापर करणारा सभासद.

(अ) मिळकत पत्रिकेत ‘पट्टेदार (L)’ म्हणून सदस्यांची नोंद का ठेवली जाते?

गृहनिर्माण संस्थांची मालमत्ता ही सामूहिक मालकीत असल्याने, त्या जमिनीचा कायदेशीर हक्क संस्थेकडे राहतो. हे तत्त्व महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम, 1960, तसेच शासकीय भूविकास नियमावली, आणि शहर सर्व्हे / प्रॉपर्टी कार्ड व्यवस्थापन नियम यांच्या संयुक्त चौकटीत बसविलेले आहे.

या रचनेत पुढील मुद्दे महत्वाचे ठरतात:

1) संस्था ही सामूहिक कायदेशीर व्यक्ती (Body Corporate)  :

अधिनियमाच्या कलम 36 नुसार, नोंदणीकृत संस्था ही “कायदेशीर व्यक्ती” (Legal Entity) मानली जाते. म्हणून संस्थेच्या नावावर मालमत्ता ठेवणे हे कायदेशीरदृष्ट्या अधिक सुरक्षित असते.

2) सदस्यांकडील हक्क “व्यवहाराधीन” नसतात :

सदस्याला संस्थेच्या माध्यमातून भूखंडाचा ताबा व वापर हक्क मिळतो, परंतु तो हक्क संस्थेच्या परवानगीशिवाय हस्तांतरित करता येत नाही. त्यामुळे नोंदीत “पट्टेदार (L)” ही नोंद ठेवली जाते, जी दर्शवते की — “हा भूखंड संस्थेच्या ताब्यातील असून, त्याचा उपयोग संबंधित सदस्य करीत आहे.”

3)  जमिनीवरील सामान्य सुविधा (Common Amenities) :

रस्ते, बगीचा, ड्रेनेज, पार्किंग, विजेच्या लाईन्स इ. या सर्वांचा वापर सामूहिक असल्याने, जमीन एकत्रितरीत्या संस्थेच्या नावावरच ठेवणे आवश्यक ठरते.

म्हणून मिळकत पत्रिकेतील “पट्टेदार (L)” नोंद ही सदस्याचा भाडेकरू म्हणून उल्लेख नसून, तो संस्थेच्या अंतर्गत नियमांनुसार भूखंडाचा कायदेशीर वापरकर्ता आहे, हे दाखविणारी प्रशासनिक नोंद असते.

(ब) संस्थेचे नाव मालक म्हणून काढून सदस्यांची नावे नोंदवल्यास निर्माण होणाऱ्या अडचणी :

भुखंडधारक संस्थेची जमीन संस्थेच्या नावावरून थेट सदस्यांच्या नावावर नोंदवली, तर ते तत्त्वतः सहकाराच्या उद्दिष्टाशी विरोधात जाते. यामुळे पुढील कायदेशीर आणि व्यवहार्य पेच निर्माण होतात:

1) संस्था अस्तित्वहीन ठरते (Loss of Legal Identity) :

संस्थेच्या नावावर मालमत्ता नसल्यास, ती “सहकारी गृहनिर्माण संस्था” या स्वरूपात कायदेशीर अस्तित्व गमावते. कारण तिच्याकडे सामूहिक मालकी नसल्याने ती “गृहनिर्माण संस्था” म्हणून ओळखलीच जाऊ शकत नाही.

संस्थेचे उद्दिष्टच सामूहिक मालकीचे व्यवस्थापन हे आहे. जर प्रत्येक सदस्याचा भूखंड स्वतंत्र मालकी म्हणून नोंदवला, तर संस्था सहकारी गृहनिर्माण संस्था या श्रेणीतून बाहेर पडते. ती केवळ एक “Group of individual owners” राहते, जी सहकार अधिनियमाच्या चौकटीत बसत नाही.

2) उपनियम व अधिनियमातील विरोधाभास :

संस्थेच्या उपनियमांमध्ये स्पष्ट नमूद असते की जमीन संस्थेच्या नावावर राहील आणि सदस्यांना वापराचा हक्क दिला जाईल. जर नोंदीतून संस्थेचे नाव काढले, तर ते उपनियमांचे उल्लंघन ठरते, ज्यामुळे संपूर्ण नोंदणीच रद्द होऊ शकते.

3) सामायिक सुविधांचे अधिकार अस्पष्ट होतात

जर प्रत्येक भूखंड स्वतंत्रपणे सदस्यांच्या नावावर गेला, तर रस्ते, जलवाहिनी, गार्डन इत्यादी सामायिक जागांवरील हक्क कुणाकडे राहतील यावर अस्पष्टता निर्माण होते. भविष्यात वाद, खटले आणि व्यवस्थापनातील विसंवाद अपरिहार्य ठरतो. तसेच, संस्थेच्या नावे असलेल्या एकत्रित जमिनीत रस्ते, गार्डन, ड्रेनेज, सुरक्षा कार्यालय, सार्वजनिक जागा इ. येतात. ही जागा कोणत्याही वैयक्तिक भूखंडात मोडत नाही. संस्थेचे नाव काढले तर या सामायिक सुविधांवरील कायदेशीर हक्क अस्पष्ट होतो — कोण मालक आणि कोण जबाबदार हा प्रश्न अनुत्तरित राहतो.

4) प्राधिकरणांसमोरील प्रतिनिधित्वाचा प्रश्न :

सद्यस्थितीत संस्था सदस्यांचे प्रतिनिधित्व करते — उदा., विकास परवानगी, वीजजोडणी, पाणीपुरवठा, सार्वजनिक सेवा यासाठी संस्था अधिकृत संपर्कबिंदू (Authorized Entity) असते.
जर जमिनीवरील मालकी वैयक्तिक स्तरावर नोंदली गेली, तर प्रत्येक सदस्यास स्वतंत्रपणे प्राधिकरणाशी संपर्क साधावा लागेल, ज्यामुळे व्यवहारात गोंधळ निर्माण होतो.
.

5) कायदेशीर दायित्व व जबाबदारींचा विसंवाद :

संस्थेच्या कायदेशीर दायित्वांत (उदा. वीज, पाणी, अग्निसुरक्षा, पर्यावरण परवाने इ.) एकत्रित जबाबदारी असते. सदस्यांचे स्वतंत्र मालकत्व नोंदवल्यास, कोण कोणत्या भागासाठी जबाबदार आहे हे निश्चित करणे कठीण ठरते — आणि कोणतीही दुर्घटना किंवा वाद निर्माण झाल्यास जबाबदारी ठरवणे जवळजवळ अशक्य बनते.

6) सहकार तत्त्वावर आधारित एकत्रित निर्णयप्रक्रिया संपुष्टात येते:

संस्था म्हणजे एकत्र निर्णय घेणारे सामूहिक व्यासपीठ. संस्थेचे नाव काढून मालकी वैयक्तिक केल्यास, निर्णयक्षमता विखुरते — प्रत्येक सदस्य स्वतंत्र ‘owner’ बनतो, आणि संस्था केवळ नावापुरती राहते. संस्था केवळ नावापुरती राहते; सहकाराच्या भावनेचा पाया कोलमडतो आणि एकत्रित निर्णय प्रक्रिया संपते.

(क) निष्कर्ष :-

“भुखंडधारक संस्थांमध्ये सदस्य वैयक्तिक कर भरतात, पण मालकीचा कायदेशीर पाया सामूहिक राहतो.” मिळकत पत्रिकेतील “पट्टेदार (L)” ही नोंद संस्थेच्या सामूहिक मालकी रचनेचे प्रशासनिक प्रतिबिंब आहे. ही नोंद केवळ कायदेशीर सुरक्षिततेसाठी ठेवली जाते, आणि त्यातून सदस्याचे भाडेकरूपण सिद्ध होत नाही. संस्थेचे नाव मालक म्हणून काढून सदस्यांची नावे समाविष्ट करणे हे

·         सहकार अधिनियमाच्या मूलभूत तत्वांना विरोधात,

·         संस्थेच्या अस्तित्वाला धक्का देणारे,

·         आणि भविष्यकाळात विवाद व कायदेशीर गुंतागुंत निर्माण करणारे ठरेल.

त्यामुळे, संस्था नावावर जमीन ठेवणे ही केवळ कायदेशीर अट नव्हे, तर सहकारी व्यवस्थेची अत्यावश्यक आणि तर्कसंगत रचना आहे. संस्थेचे नाव काढून सदस्यांची नावे थेट मालक म्हणून नोंदवली गेली, तर सहकारी अधिनियम, उपनियम आणि न्यायालयीन निर्णय यांच्या चौकटीत ती पद्धत कायदेशीरदृष्ट्या ग्राह्य राहणार नाही.

मिळकत पत्रिकेतील “पट्टेदार (L)” नोंद ही संस्थेच्या सामूहिक मालकी रचनेचे प्रशासनिक प्रतिबिंब आहे. संस्थेचे नाव काढून सदस्यांची वैयक्तिक नोंदी केल्यास उपनियमांचा भंग, सामायिक सुविधा अस्पष्टता, प्राधिकरणांसोबत व्यवहारातील गुंतागुंत आणि सहकारी भावना कमी होणे यासारखे परिणाम होऊ शकतात.

४. न्यायालयीन दृष्टीकोनातून “सह-मालक vs भाडेकरू" वास्तविकता :

(१) मा. उच्च न्यायालय, मुंबई - वर्ष : 1993

प्रकरण: Manohar Ramchandra Sarfare vs. The Konkan Co-op. Housing Society Ltd.

दाव्याचे स्वरूप: सदस्याने न्यायालयात दावा केला की त्याच्याकडे असलेले निवासस्थान हे त्याच्या सभासदत्वाच्या अधिकारातून प्राप्त झाले आहे, भाडेकराराच्या स्वरूपातून नव्हे. संस्थेने मात्र त्याला भाडेकरू मानून कारवाई करण्याचा प्रयत्न केला.

निर्णय: “Co-operative Society चा सदस्य भाडेकरू नाही. सदस्यत्वामुळे त्याला निवासस्थानाचा ताबा वैधानिकरीत्या प्राप्त होतो.”

तात्पर्य: या निर्णयाने ठामपणे स्पष्ट केले की सभासद आणि संस्थेतील नाते भाडेकरू-मालकाचे नव्हे, तर सदस्य-संस्था या सहकारी नात्याचे आहे. संस्था मालक म्हणून वरचढ नसून, सदस्य स्वतःच त्या मालमत्तेचा वैध सहमालक असतात.

 

(२) मा. उच्च न्यायालय, मुंबई - वर्ष : 1995

प्रकरण: Karvenagar Sahakari Griha Rachana Sanstha Maryadit vs. State of Maharashtra

दाव्याचे स्वरूप: सदस्यांना दिलेले भूखंड हे “लीज” आहेत की “मालकी वापरहक्क” या प्रश्नावर संस्था व सदस्यांमध्ये वाद निर्माण झाला. शासन व स्थानिक प्रशासनाने त्या हक्काचा स्वरूप ठरविण्याचा प्रयत्न केला.

निर्णय: “Such grant is not a lease in the nature of tenancy; it is an incident of membership.”

तात्पर्य: संस्थेकडून दिलेला भूखंड हा भाडेकरारावर आधारित नसून सभासदत्वाचा घटक आहे. मिळकतपत्रिकेतील “पट्टेदार (L)” ही नोंद कायदेशीर वापरहक्काचे संकेतक आहे, भाडेकरूपणाचे नाही.

 

(३) महाराष्ट्र राज्य सहकारी अपील न्यायाधिकरण - वर्ष : 2007

प्रकरण: Shivneri Co-op. Housing Society Ltd. vs. Rajendra Deshpande & Ors.

दाव्याचे स्वरूप: संस्थेने काही सभासदांविरुद्ध “भाडे न दिल्याचा” आरोप ठेवून कारवाई सुरू केली होती. सदस्यांनी प्रतिवाद केला की संस्था आणि सभासद यांच्यात “भाडेकरार” संबंध नाही.

निर्णय: “संस्थेतील सदस्याविरुद्ध ‘भाडे न दिला’ म्हणून कारवाई करता येत नाही; कारण संस्था आणि सदस्य यांच्यात भाडेकरार अस्तित्वात नाही.”

तात्पर्य: संस्था सदस्यांकडून घेतलेली रक्कम ही भाडे नव्हे, तर सामायिक खर्चाचा वाटा आहे. म्हणून सदस्यावर भाडे न भरल्याचा गुन्हा लावता येत नाही. ते भाडेकरू नसून संस्थेचे हक्कधारक सहमालक असतात.

 

(४) मा. सर्वोच्च न्यायालय, नवी दिल्ली - वर्ष : 2014

प्रकरण: Maharashtra Co-operative Housing Federation vs. State of Maharashtra

दाव्याचे स्वरूप: गृहनिर्माण संस्थांच्या जमिनींच्या हस्तांतरण, मालकी व सभासदांच्या हक्कांविषयी शासन व संस्था यांच्यात वाद निर्माण झाला होता. प्रश्न होता — संस्थेच्या नावावर जमीन असताना सभासदांचा हक्क कोणत्या स्वरूपात राहतो?

निर्णय: “The land may stand in society’s name, but beneficial ownership vests with the members collectively.”

तात्पर्य: संस्थेचे नाव जमीनदस्तावर असले तरी प्रत्यक्ष मालकीचा लाभ सदस्यांकडेच राहतो. संस्था ही केवळ सामूहिक मालकीचे व्यवस्थापन करणारी प्रतिनिधी संस्था असते.

 

(५) मा. उच्च न्यायालय, मुंबई - वर्ष : 2018

प्रकरण: Juhu Vile Parle Development Co-op. Housing Society vs. MCGM

दाव्याचे स्वरूप: संस्थेच्या पुनर्विकास प्रक्रियेत काही सभासदांनी दावा केला की जमीन संस्थेच्या नावावर असल्याने ते “भाडेकरू” आहेत आणि त्यांना अतिरिक्त संरक्षण मिळावे.

निर्णय: “Members of a co-operative housing society hold their premises not as tenants but as co-owners.”

तात्पर्य: हा अलीकडील निर्णय स्पष्ट सांगतो की सभासदाचे नाते सहमालकीचे आहे, भाडेकरूपणाचे नव्हे. संस्थेचे नाव जमीन दस्तावर असणे ही फक्त प्रशासकीय बाब आहे; सभासदाचा वैध मालकी हक्क त्यावर अबाधित राहतो.

 

(६) मा. उच्च न्यायालय, मुंबई - वर्ष : 2013

प्रकरण: Margaret Almeida & Ors. vs. Bombay Catholic Co-op Housing Society Ltd.
दाव्याचे स्वरूप: सभासदांनी याचिका दाखल केली की त्यांच्या सदस्यत्वाशी संबंधित त्यांनी मिळवलेले भूखंड व निवासस्थान ‘भाडेकरार’ स्वरूपाचे नाहीत; संस्थेत भाडेकरू म्हणून त्यांच्यावर कारवाई होत आहे.

निर्णय: “A co-operative housing society comprising lessee members, freehold land-owners and others cannot shift the status of its member to tenant merely by nomenclature.”

तात्पर्य: सदस्यत्व व सभासदाचा हक्क ‘भाडेकरू’च्या कॅटेगरीमध्ये येत नसतो; संस्था त्याला भाडेकरू म्हणून वागवू शकत नाही. 

 

(७) मा. उच्च न्यायालय, मुंबई - वर्ष : 2015

प्रकरण: N. Jethani vs Shri Shivaji Co-op Housing Society Ltd.

दाव्याचे स्वरूप: सभासदाने याचिका दाखल केली होती की त्यांच्या भूखंडाची वाटप “tenant-ownership housing society” अंतर्गत झाली आहे; त्यामुळे त्यांना पूर्ण मालकी हक्क आहे की नाही?

निर्णय: “In a tenant-ownership housing society the land is held either on lease-hold or free-hold basis by Society and the houses/flats are owned by the members.”

तात्पर्य: ‘Tenant-ownership housing society’ मध्ये जमीन संस्थेच्या नावावर असली तरी प्रत्यक्ष मालकी हक्क सदस्यांकडेच असतो. संस्था ही केवळ मालमत्ता धारक (Title Holder) म्हणून काम करते, परंतु भूखंडाचा किंवा निवासस्थानाचा वापर, ताबा आणि हस्तांतरणाचा कायदेशीर अधिकार सदस्याकडेच राहतो. मिळकतपत्रिकेवरील सदस्यांची “पट्टेदार (L)” ही नोंद केवळ प्रशासकीय सोयीसाठी ठेवली जाते, जेणेकरून संस्थेचा मालकी नोंदीवरील सातत्य राखले जाईल. परंतु वास्तविक मालकी हक्काचे कायदेशीर अधिष्ठान हे संस्थेकडून सदस्याला देण्यात येणाऱ्या भाग-दाखल्यावरून (Share Certificate) सिद्ध होते.

 

वरील सर्व निर्णयांमधून एकच मूलभूत तत्त्व उभे राहते की,

भुखंडधारक किंवा गृहनिर्माण सहकारी संस्थेमध्ये सभासदाचा संबंध “मालकी-स्वत्वाचा” असताे, “भाडेकरू” म्हणून नाही. भुखंडधारक गृहनिर्माण संस्थेतील सभासद हा भाडेकरू नाही; तो संस्थेच्या माध्यमातून आपल्या मालकीचा कायदेशीर हक्क वापरणारा सहमालक असताे. सदस्यता, वाटप केलेला भूखंड, आणि मिळकतपत्रिकेतील नोंदी हे सर्व मिलून त्या हक्काची कायदेशीर चौकट उभी करतात. संस्थेच्या नावावर मालमत्ता ठेवणे ही सदस्यांच्या सामूहिक हितसुरक्षेची प्रक्रिया आहे, त्यावर मालकी गाजविण्याचा हेतू नसताे.

५. “सह-मालक vs भाडेकरू" यांतील कायदेशीर व व्यवहार्य फरक

(कायदेशीर संदर्भांसह – Maharashtra Co-operative Societies Act, 1960 आणि संबंधित नियमांच्या आधारे)

क्र

बाब / घटक

भाडेकरू (Tenant)

सहमालक (Co-owner / Member)

कायदेशीर संदर्भ

कायदेशीर नाते

मालकासोबत भाडेकरारावर आधारित तात्पुरता वापरहक्क

सभासदत्वावर आधारित कायमस्वरूपी हक्क

MCS Act, 1960 - Section 22 (Membership), Section 23

मालकी हक्काचे स्वरूप

मालकी नाही; फक्त वापराचा अधिकार

संस्थेद्वारे देण्यात आलेला वैधानिक मालकी हक्क

Section 30(2), Rule 10 & 11

हक्काचा आधार

भाडेकरार / Maharashtra Rent Control Act

सहकारी अधिनियम, उपनियम आणि भागदाखला (Share Certificate)

Rule 60-68, Model Bye-laws 9 & 19

निवासस्थानाचा ताबा

मालकाच्या परवानगीवर अवलंबून

सभासदत्वामुळे वैध ताबा प्राप्त

Section 22(2) & Judicial precedents (1993-2018)

कर व दायित्वे

मालक जबाबदार

सदस्य वैयक्तिकरित्या जबाबदार

Model Bye-law 66(a), 67(b)

हस्तांतरण / विक्री अधिकार

परवानगीशिवाय शक्य नाही

संस्थेच्या संमतीने वैध हस्तांतरण

Section 30(2), Rule 24, Model Bye-law 38

कायदेशीर संरक्षण

Maharashtra Rent Control Act, 1999

MCS Act, 1960 (Self-contained code)

Section 91 (Dispute), Section 79

संस्थेशी नाते

नाही

वैधानिक सदस्यत्व नाते

Section 2(19) “Member” - Definition

निर्णय प्रक्रियेत सहभाग

नाही

मतदानाचा अधिकार आणि सहभाग

Section 27, Model Bye-law 112

१०

संपत्तीवरील हक्काचे स्वरूप

तात्पुरता वापर

वारसाहक्काने हस्तांतरित होणारा मालकी हक्क

Section 30(2), Model Bye-law 38

११

संस्थात्मक भूमिका

नाही

सामूहिक व्यवस्थापनाचा घटक

Section 73(1)(a), Model Bye-law 112

१२

कायदेशीर ओळख

“भाडेकरू” (Occupant)

“सहमालक / सभासद” (Member / Co-owner)

Judicial precedents: 1993, 1995, 2014, 2018

६. निष्कर्ष

भुखंडधारक गृहनिर्माण संस्थेतील सदस्य हे भाडेकरू नसुन संस्थेच्या सामूहिक मालमत्तेचे कायदेशीर "सहमालक" असतात. संस्थेचे अस्तित्व म्हणजे सदस्यांच्या हक्कांचे रक्षण करणारी सामूहिक व्यवस्था असते. संस्था व सभासद यांनी एकमेकांविषयी विश्वास, पारदर्शकता आणि कायदेशीर जागरूकता कायम ठेवणे हेच सहकाराचे खरे बळ असते. संस्थेचे नाव महसुल नोंदीत ठेवणे हे कायदेशीर सातत्य व सामूहिक हक्कांचे रक्षण करण्यासाठी आवश्यक असते. संस्था सदस्यांच्या हक्कांचे कवच असते — नियंत्रणासाठी नव्हे, संरक्षणासाठी.

💬 सारांश:

“सभासद भाडेकरू आहेत” असा गैरप्रचार टाळावा, कारण तो संस्थेच्या कायदेशीर प्रतिष्ठेवर आणि सहकारी सौहार्दावर विपरीत परिणाम करू शकतो. संस्थेचा प्रत्येक सभासद हा मालकी हक्काचा "सहमालक" या नात्याने वैध भागीदार असताे — आणि हीच सहकाराची खरी ओळख असते.

प्रत्येक सभासदाने, संस्थेच्या कायदेशीर बाबींविषयी चर्चा करताना, सामाजिक माध्यमांवर प्रतिक्रिया देताना किंवा इतर सभासदांशी संवाद साधताना : फक्त अधिकृत, प्रमाणित आणि संदर्भाधारित माहितीच द्यावी. हेच सदस्यत्वाचे नैतिक कर्तव्य आणि सहकारभावनेचे प्रतिक असते.

7. Disclosure / कॉपीराईट सूचना :

हा लेख शैक्षणिक, संदर्भात्मक आणि प्रबोधनात्मक हेतूसाठी तयार करण्यात आला आहे. लेखाचा हेतू केवळ माहितीपर आणि शैक्षणिक असून, तो कोणत्याही व्यक्ती, संस्था किंवा शासकीय यंत्रणेविरुद्ध आरोप अथवा मतप्रदर्शन म्हणून ग्राह्य धरू नये. यातील सर्व विचार, विवेचन आणि कायदेशीर विश्लेषण हे उपलब्ध अधिनियम, नियम, न्यायालयीन निवाडे आणि लेखकाशी संबंधित वैयक्तिक अभ्यासाच्या आधारे सादर करण्यात आले आहेत. या लेखातील विवेचन हे सर्वसाधारण मार्गदर्शनासाठी असून, वाचकांनी आपल्या विशिष्ट प्रकरणासंबंधी सल्ल्यासाठी तज्ज्ञ अथवा अधिकृत कायदेशीर सल्लागारांचा सल्ला घ्यावा. लेखक आणि “सहकार संवाद” या व्यासपीठाकडून लेखातील माहितीच्या वापरामुळे निर्माण होणाऱ्या कोणत्याही प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष परिणामाची जबाबदारी स्वीकारली जाणार नाही.

कॉपीराईट सूचना :

या लेखातील संपूर्ण मजकूर, स्वरूप आणि मांडणी यावर लेखकाचे सर्वाधिकार (Copyright ©) राखीव आहेत. लेखाचा कोणताही भाग — मुद्रित, डिजिटल किंवा इलेक्ट्रॉनिक माध्यमातून — लेखकाच्या लेखी संमतीशिवाय पुनरुत्पादित, प्रकाशीत, प्रसारित किंवा वापर करू नये.

लेखातील कोणत्याही भागाबद्दल शंका असल्यास किंवा विशिष्ट माहितीचा उपयोग संस्थात्मक उद्देशाने करावयाचा असल्यास, वाचकांनी थेट लेखक / संपादकांशी संपर्क साधावा.

लेखातील विधाने ही संदर्भाधारित असून, ती कोणत्याही संस्थेच्या अधिकृत भूमिकेचे प्रतिनिधित्व करत नाहीत. या लेखाचा हेतू केवळ कायदेशीर जागरूकता वाढविणे आणि सहकारी क्षेत्रातील वस्तुनिष्ठ समज दृढ करणे हाच आहे.

---------------------------*********************---------------------------