- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
“सहकार संवाद” Series - लेख क्र. 5
“समाजात जागरूकता निर्माण करण्याच्या या प्रवासात जेथून ज्ञान आणि प्रेरणा मिळते, त्या प्रत्येक स्रोताचे मनापासून आभार.”
✍️ लेखक : श्री.सुनिल शेलार, सहकार व कृषि क्षेत्रातील अभ्यासक
| Dated : 16/11/2025 |
परंडा नगरिचे
भुमिपुत्र चि. अमित गोकुळ लोकरे यांची नुकतीच महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगाच्या
(MPSC) स्पर्धा परीक्षेत महाराष्ट्रातून पाचवा क्रमांक मिळवून "उपजिल्हाधिकारी
(Deputy Collector)" या प्रतिष्ठित पदासाठी निवड झाली. हा क्षण केवळ त्यांच्या कुटुंबाचा
नाही, तर संपूर्ण परिसरासाठी अभिमान वाढवणारा ठरला आहे. यानिमित्य, चि. अमित यांचा भव्य नागरी सत्कार १६ नोव्हेंबर २०२५ रोजी, सोनिगिरी (ता. परांडा,
जि. धाराशिव) येथे अत्यंत भव्यदिव्य वातावरणात संपन्न झाला. सोहळ्याला परिसरातील
मान्यवर, समाजातील प्रतिष्ठित व्यक्ती, शासकीय अधिकारी तसेच ग्रामस्थ मोठ्या संख्येने
उपस्थित होते. या कार्यक्रमात आमचे मार्गदर्शक आणि चि. अमित चे मामा श्री. बाळराजे
मुळीक (स्वीय सहाय्यक मा. उपमुख्यमंत्री अजितदादा पवार) यांनी भाषणात चि. अमित
यांच्या संघर्षमय प्रवासाबद्दल अत्यंत दाटत्या कंठातून अंर्तमन मोकळे केले.
१) शैक्षणिक प्रवास : ग्रामीण
ते महानगर
चि. अमित लोकरे यांचे प्राथमिक शिक्षण परांडा येथे, माध्यमिक शिक्षण बार्शी व लातूरमध्ये तर अभियांत्रिकीचे (Engineering) शिक्षण मुंबई येथे झाले. गावापासून महानगरापर्यंतचा हा शैक्षणिक प्रवास त्यांच्या जिद्दीचे प्रतीक आहे.
२) दोन वेळचे अपयश ; 0.25 आणि
1 मार्कचा आक्रोश. . . . पण हार नाही
अमित लोकरे यांच्या प्रवासातील सर्वात कठीण टप्पा
म्हणजे सलग दोन वर्षे आलेले ; शून्याच्या टोकाचे. . . . अपयश. . . .
· सन २०२२
मध्ये फक्त 0.25 मार्कने त्यांची संधी हुकली. हा फरक इतका क्षुल्लक होता की कोणाच्याही
मनात आयुष्यभर एक जळजळीत खंत राहिली असती.
· सन २०२३
मध्ये पुन्हा एकदा फक्त 1 मार्कने पद हुकले. वर्षानुवर्षांचा अभ्यास, ताण, त्याग आणि
अपेक्षा. . . . आणि शेवटी फक्त एक मार्क.
अनेक विद्यार्थी अशा क्षणी कोसळतात. . . मार्ग
बदलतात. . .निराशांवर शिक्कामोर्तब करतात.
परंतु चि. अमित यांनी अपयशाला स्वीकारले नाही; उलट तेच त्यांचे इंधन ठरले. त्या 0.25 मार्क आणि 1 मार्कच्या वेदना त्यांच्या मनात नेमक्या याच दिवशी “उपजिल्हाधिकारी” पदासाठीच्या अंतिम यशात रूपांतरित झाल्या.
३) दुःखद घटना : वडिलांच्या
निधनामुळे कोसळलेले जग… पण उभा राहिलेला मुलगा
सन २०२२ मध्ये कोरोनाच्या काळात चि. अमित यांच्या
आयुष्यातील सर्वात कठीण प्रसंग घडला, वडील कै. गोकुळ लोकरे यांचे दुःखद निधन.
एखाद्या स्पर्धा परीक्षेच्या उमेदवारासाठी वडील
म्हणजे, मार्गदर्शक, आधारस्तंभ, प्रेरणास्थान, आणि मानसिक शांतता देणारा हात. अचानक
आलेल्या या दु:खाने केवळ त्यांचे घर नाही, तर त्यांचे मनही हादरून गेले.
त्या दिवशी चि. अमित यांच्यासाठी,
फक्त एक पालक नव्हे, तर त्यांचा सर्वात मोठा विश्वास
हरवला होता.
अशा अवस्थेत अनेक तरुण अभ्यास सोडतात, आयुष्याची दिशा बदलतात. परंतु अमित यांनी दुःखावर ठिगळ लावले नाही. ते दुःख आपल्या ध्येयाच्या पायाखाली ठेवून त्यांनी उठून दिसण्याचा मार्ग निवडला.
४) चि. अमित यांचे आईचे अपार
धैर्य
पतीच्या निधनाने निराधार झालेली महिला. . .
घराची जबाबदारी, मुलाच्या भविष्याची चिंता, समाजाचे
प्रश्न, आर्थिक तणाव. . .
ही सर्व ओझी सहन करत, चि. अमित यांच्या आईने
स्वतःला तुटू दिले नाही.
·
मुलाच्या
अभ्यासात अडथळा येऊ दिला नाही
·
घरातील
प्रत्येक गरज स्वतः पेलली
·
त्याला
भावनिक आधार दिला
·
आणि सर्वात
महत्त्वाचे, त्याच्या स्वप्नावरचा विश्वास कधीही ढळू दिला नाही
आईचा हा निःस्वार्थ, नि:शब्द त्याग अमित यांच्या यशाचा मूलाधार आहे. या सर्व प्रतिकूल परिस्थितीत अमित यांच्या आईने अपार जिद्द आणि चिकाटी दाखवली. कुटुंबाची जबाबदारी स्वतःच्या खांद्यावर घेतली आणि मुलाच्या शिक्षणाला किंचितही व्यत्यय येऊ दिला नाही. त्यांचे आईने दाखवलेली मानसिक शक्ती ही प्रशंसनीय आणि प्रेरणादायी आहे. त्यांचा धैर्यशील निर्धार हा चि. अमित यशामागील सर्वात मोठा आधारस्तंभ आहे.
५) मामा श्री. बाळराजे मुळीक
यांची माया आणि साथ
या कठीण प्रवासात, श्री. बाळराजे मुळीक
यांनी अमितचा हात कधीही सोडला नाही. त्यांनी मानसिक आधार व सहकार्य, मार्गदर्शन, आणि
कुटुंबाला सततची शाबासकी अशा विविध स्वरूपात लोकरे कुटुंबाच्या पाठीशी ठामपणे उभे राहून
एक आदर्श ‘मामा’ म्हणून आपली भूमिका निभावली.
मानसिकदृष्ट्या तुटून पडण्याची वेळ असताना, ज्यांनी हात धरून पाठीशी उभे राहिले ; त्यांची किंमत संघर्षातून आलेला विद्यार्थीच सर्वात खोल समजून घेतो.
६) यशामागील प्रेरक शक्ती
चि. अमित लोकरे यांनी अत्यंत प्रतिकुल परिस्थितीस सय्यमाने सामोरे जात, एकाग्रतेने, स्थिर अभ्यास पद्धतीने आणि सकारात्मक दृष्टीकोनातून MPSC परिक्षेतील हे यश मिळवले. त्यांच्या प्रवासात कुटुंबाचे मार्गदर्शन, स्वत: वरिल विश्वास आणि मामाची साथ ही मोठी आधारस्तंभ ठरली. त्यांच्या निवडीने परंडा तालुका आणि धाराशिव जिल्हा यांचा गौरव वाढला आहे.
७) समाजासाठी प्रेरणादायी संदेश
चि. अमित लोकरे यांचे यश हे ग्रामीण भागातील प्रत्येक
तरुणासाठी एक प्रकाशस्तंभासारखे मार्गदर्शक उदाहरण आहे. सीमित साधने, अपार संघर्ष,
दोन वेळा आलेले अपयश, आणि भावनिक हानी ; या सार्या प्रतिकूलतेतही त्यांनी ध्येयापासून
नजर हटू दिली नाही.
आजच्या बदलत्या सामाजिक जगात अनेक तरुण पहिल्या
अडथळ्यावर हार मानतात, एवढेच नव्हे तर घरातील परिस्थिती, आर्थिक ताण, सामाजिक दबाव
यांना कारण ठरवत स्वप्ने सोडून देतात . . परंतु चि. अमित लोकरे यांनी सिद्ध करून दिले
की,
"स्वप्न मोठे असेल, तर संघर्षही मोठाच असतो;
पण जिद्द त्याहूनही मोठी असेल, तर विजय नक्कीच तुमचाच असतो."
त्यांचा प्रवास सांगतो ;
·
तुमची पार्श्वभूमी
तुमची ओळख नाही
·
तुमची साधनं
तुमची मर्यादा नाहीत
·
आणि अपयश
ही कधीही शेवटची रेषा नसते
अमित यांचे यश हे हजारो ग्रामीण विद्यार्थ्यांसाठी
एक संदेश आहे की, दयाळूपणा, कष्ट, सातत्य, कुटुंबाची साथ आणि योग्य मार्गदर्शन यांच्या
बळावर कोणतेही शिखर गाठता येते.
आज समाजात तरुणांना योग्य दिशा देणारे मार्गदर्शक
कमी झालेत. . . पण अशा यशकथा तरुणांच्या मनात नवी ऊर्जा निर्माण करतात, त्यांना त्यांच्या
वास्तवातून उठून स्वतःचा नवा इतिहास लिहिण्यासाठी प्रेरणा देतात.
चि. अमित यांचा प्रवास हा फक्त ‘एक विद्यार्थी
उपजिल्हाधिकारी झाला. . इतकाच नाही. .
तो एका मुलाच्या जिद्दीचा, एका आईच्या त्यागाचा, आणि एका मामाच्या निस्वार्थ पाठिंब्याचा
सामूहिक विजय आहे.
असे विजय समाजाला नवी विचारसरणी देतात;
“यश हे एकट्याचे नसते. . . . ते संपूर्ण समाजाची
मानसिकता बदलू शकते.”
चि. अमित लोकरे यांच्या पुढील सेवाप्रवासासाठी
“सहकार संवाद”तर्फे तसेच परंडा नगरातील सर्व ग्रामस्थांच्या वतीने मनःपूर्वक
हार्दिक शुभेच्छा. . . !
त्यांचे कार्य, त्यांची मूल्ये, आणि त्यांची विनम्रता
प्रशासनात एक नवा आदर्श निर्माण करो; ही सदिच्छा!!
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स